रायगड - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या रामजन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयामार्फत लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, असे शांतता आवाहन आज महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केले. ते शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन खटल्याचा निकाल 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत लागण्याची शक्यता आहे, असे इनामदार म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर वाद्य वाजविणे, गुलाल उधळणे, मिरवणुका काढणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून मतप्रदर्शन करणे, सामाजिक भावना दुखविणे असे कृत्य करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलीस यंत्रणेची सायबर सेलमार्फत यावर नजर असून असे कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.