रायगड - सुधागड तालुक्यातील बलाप गावातील सर्व ग्रामस्थ शुक्रवारी (दि.३) तीन दिवसांसाठी गावाबाहेर आले आहेत. दर नऊ वर्षांनी येणारी जवळपास ८० वर्षांहून जुनी रीघवनी परंपरा गावकरी जोपासत आहेत. गावात पूर्वी कोणतेही साथीचे रोग आल्यास संपूर्ण गाव सोडून लोक गावाबाहेर जात होते. तसेच गावात या दिवशी भुतप्रेत किंवा आत्मा फिरतात, अशी यामागे अंधश्रद्धा असल्याचे बोलले जाते. तर काहींच्या मते सर्वांनी एकत्र येण्याचे हे एक माध्यम आहे.
दर नऊ वर्षांनी येणाऱ्या मे महिन्याच्या पहिल्या अमावस्येला गावातील सर्व लोक घरांना कुलूप लावून गाव सोडतात. आणि गावाबाहेर वेशीवर शेतात खोपटे किंवा झोपड्या करून साधारण तीन दिवस राहतात. हे ग्रामस्थ शुक्रवारी (दि. ३) सकाळी ७ वाजता बाहेर पडले आहेत. साधारण ३५ झोपड्या (खोपटे) बांधल्या आहेत. गावातील अंदाजे ३०० अबाल-वृद्ध व तरुण तेथे राहत आहेत. शनिवारी (दि .४) रात्री गावात सर्व लोक जाऊन बोकड कापणार आणि पारंपरिक विधी करणार आहेत. त्यांनतर रविवारी (दि .५) सर्व गावकरी पुन्हा आपापल्या घरी जाणार आहेत.
यावेळी ते आपले सर्व खाणेपिणे येथेच करतात. अशी ही जुनी प्रथा जोपासली जात आहे. मुंबईला राहणारे लोक सुद्धा आता या प्रथेसाठी आले आहेत. सर्वजण एकत्र येऊन मजा व मनोरंजन करणे, असे सध्या या प्रथेचे स्वरूप आहे. एक प्रकारे या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात, असे राजेंद्र खरीवले या ग्रामस्थाने यावेळी सांगितले.
पूर्वी गावात साथीचे रोग आल्यावर त्या रोगांचे विषाणू-जिवाणूंचा प्रसार होऊ नये म्हणून सर्व लोक गावाबाहेर यायचे. मात्र, त्यांनतर याला भुतप्रेत ही अंधश्रद्धा जोडली गेली. मात्र, आम्ही तरुणांनी या परंपरेचे कारण पूर्वीचे साथीचे रोग असल्याचे शोधले आहे. या पाठीमागे कोणती भीती किंवा अंधश्रध्दा किंवा अघोरी प्रथा नाही, असे किशोर खरीवले, उपसरपंच, बलाप यांनी सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती करणार प्रबोधन
संसर्गजन्य रोगाची साथ एखाद्या गावात आल्यावर गाव रिकामे करून गावाबाहेर राहिल्यानंतर साथ आटोक्यात येते, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे गाव टाकणी करून असे आजार नियंत्रणात येणे शक्य नाही. गाव टाकणी सारख्या रूढी-परंपरांची चिकित्सा करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत या गावातल्या नागरिकांशी संवाद साधून याबाबत प्रबोधन केले जाईल, असे मत महाराष्ट्र अनिस संघटनेचे जिल्हा कार्यध्यक्ष मोहन भोईर यांनी मांडले आहे.