रायगड : माणगाव तालुक्यातील विळे भागड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या पोस्को महाराष्ट्र लिमिटेड कंपनीत भंगारावरून सुरू असलेल्या भांडणाचा नाहक त्रास स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागला आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या पुत्रांच्या दादागिरीमुळे माणगाव तालुक्यातील भागड, वरची वाडी आणि सणस वाडी ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिकाना पोस्को कंपनीत व्यवसाय करणे कठीण झाले आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. जोपर्यंत स्थानिकांचा हा त्रास प्रशासन सोडविणार नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
माणगाव तालुक्यातील विळे भागड औद्यगिक क्षेत्रात पोस्को कंपनी गेटसमोर खासदार आणि आमदार पुत्राच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन केले. यावेळी लोकप्रतिनिधी विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी घोषणाबाजी करून आपला निषेध व्यक्त केला. या आंदोलनात परिसरातील महिला पुरुष आणि स्थानिक व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोस्को कंपनीतील भंगाराचा आहे वाद..
माणगाव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक क्षेत्रात भागड, वरची वाडी आणि सणस वाडी या तीन ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिकांच्या जमिनीवर पोस्को महाराष्ट्र लिमिटेड कंपनी उभी राहिली आहे. 80 ते 90 टक्के स्थानिकांना या कंपनीत रोजगर मिळाला आहे. तर कंपनीतील भंगार उचलण्याचा व्यवसायही स्थानिक तरुण करीत आहेत. पोस्को कंपनीमुळे स्थानिकाच्या गावाचा विकास झाला असून रोजगारही मिळाला आहे. मात्र गेल्या काही वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्याच्या हस्तक्षेपामुळे स्थानिकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिकांची फोडली जात आहेत वाहने..
विळे भागाड परिसरातील स्थानिक हे आपल्या वाहनामार्फत कंपनीतील भंगार उचलण्याचे काम करीत आहेत. मात्र खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे आणि आमदार भरत गोगावले याचे पुत्र विकास गोगावले याच्यामार्फत स्थानिक व्यवसायिकांना नाहक त्रास देण्याच्या घटना दोन महिन्यापासून सुरू झाल्या आहेत. मुंबई येथून गुंड आणून स्थानिकांचे ट्रक फोडले जात आहेत, त्याच्या वाहनातील हवा काढली जात आहे. त्यामुळे स्थानिकांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.
खासदार, आमदार पुत्राच्या दादागिरी विरोधात ग्रामस्थ एकवटले..
खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले याच्या मुलांची दादागिरी स्थानिकांच्या जीवावर बेतली जात आहे. स्थानिकांची वाहने फोडून त्यांना व्यवसायपासून दूर ठेवले जात आहे. खासदार आणि आमदार पुत्राच्या या दादागिरी विरोधात अखेर स्थानिक तीन ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन याबाबत आवाज उठविला आहे. पोस्को कंपनीच्या गेटवर या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करून या गोष्टीचा निषेध व्यक्त केला आहे. पोलिसही स्थानिकांच्या या समस्येकडे दूर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आमच्या समस्येबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन दिले आहे. तर आमचा प्रश्न प्रशासन स्तरावर सुटला नाही तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.