पनवेल - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांची मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यानंतर पनवेलमधील महत्त्वाच्या व्यक्तींसोबत भेटीगाठी घ्यायलाही त्यांनी सुरूवात केली आहे. नुकतीच त्यांनी शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांची भेट घेतली.
लोकसभेचे बिगुल वाजले असून मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्या उमेदवारीला 'हिरवा कंदील' मिळाल्यानंतर लगेचच त्यांनीपनवेलमध्ये दौरा केला. रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरणचा विचार केल्यास येथे शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य मोठे आहे. सध्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकाप-राष्ट्रवादी सत्तेत आहे. कोकण शिक्षक मतदार संघामधून राष्ट्रवादीच्या सहकार्याने शेकापचे बाळाराम पाटील हे विधान परिषदेत पोहोचले. आता मावळमधून पार्थ उमेदवार असणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
यावेळी पार्थ यांनी शेकाप आमदार बाळाराम पाटील यांच्याकडून पनवेलमध्ये केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. पनवेलमधल्या स्थानिक राजकारणाची माहिती देताना पार्थ पवार नव्या जोमाने काम करतील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
मावळमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेसमध्येच कमालीची गटबाजी असून याचा फटका पक्षाला कायम बसला आहे. यापुढील काळात गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी आणि विधानसभेच्या तिकिटासाठी 'पार्थ पवार' रामबाण औषध ठरतील, असा कार्यकर्त्यांचा होरा कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे सर्वजण मन लावून पक्षाचे काम करतील, असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जातोय. आता निवडणुकीच्या लढाईत प्रबळ उमेदवाराच्या माध्यमातून पार्थ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मावळ मतदारसंघातील चुरस पाहण्यासारखी होणार आहे, याबाबत मात्र शंका नसल्याचे जाणकारांचे मत आहे.