रायगड - कोरोना विषाणू बाधितांची रायगड जिल्ह्यामध्ये वाढत चालली आहे. पनवेलमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता 15 वर पोहचली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर आणि नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. 15 पैकी 13 कोरोनाबाधित हे सीआयएसएफचे जवान आहेत. तसेच मरकझम या दिल्लीस्थित कार्यक्रमावरून जावून आलेल्या 12 जणांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत.
रायगडमधील 15 पैकी 14 तालुके हे कोरोनामुक्त आहेत. रायगडची हद्द सुरू होणारे प्रवेशद्वार असलेला पनवेल तालुका मात्र कोरोनाबाधितांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. पनवेलमधील संक्रमित रुग्णांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. जिल्ह्यातील 257 जणांचे अहवाल कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवीण्यात आले होते. त्यातील 221 जणांची नमुने तपासणी केली असून, 189 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. 17 जणांचे रिपोर्ट अजून प्रलंबित आहेत तर एकाचा अहवाल सुरुवातीला पॉझिटिव्ह आणि नंतर निगेटिव्ह आला आहे.
2 एप्रिलला जिल्ह्यात 7 कोरोना बाधितांची संख्या होती तर आज 8 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले होते. आता ही संख्या 15 वर पोहचली आहे. वाढलेले 8 रुग्ण हे सीआयएसएफ जवान असून, ते एकाच कॉलनीत राहत असल्याने एकमेकांच्या संपर्कात येऊन त्यांना लागण झाली आहे.