रायगड : मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात धामणदेवी येथे काल 9 जून रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान दरड कोसळली होती. महामार्गावर पडलेली दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून 20 तासानंतर रस्त्यावर पडलेली मातीचा ढिगारा काढण्यास यश आले आहे. एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सांगितले.
पोलादपूर तालुक्यात पाऊस मुसळधार सुरू असून महामार्गाच्या रुंदीकरण कामामुळे डोंगर भाग हे खचले गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात. 9 जुलै रोजी रात्री साडे नऊच्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळल्याने रात्रभर वाहतूक बंद झाली होती. रस्त्यावर पडलेल्या मातीचा ढिगारा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना पुन्हा सकाळी त्याच जागेवर मातीचा मोठा ढिगारा कोसळला.
पोलीस, महामार्ग यंत्रणा यांनी जेसीबी, पोकलनच्या साहाय्याने मातीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम रात्रीपासून सुरू केले होते. वीस तासानंतर महामार्गावरील मातीचा ढिगारा बाजूला करण्यात आला असून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. तर पूर्ण रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यास अजून काही अवधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.