पनवेल - प्रचारतोफा थंडावल्यानंतर पनवेलमधील देवेद येथील भागात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी पैसे वाटप करताना एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे श्रीरंग बारणे यांच्या नावाच्या २३ मतदारांच्या चिठ्ठ्या सापडल्या आहेत. या कारवाईदरम्यान आरोपीकडून २६ हजार रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
रविवार २९ तारखेला मतदान होणार आहे. मात्र, मतदानाच्या काही तासांपूर्वीच पनवेलमध्ये पैसे वाटप होत असल्याचे समोर येत आहे. मावळ मतदारसंघात मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैशांचे वाटप सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर काही तासांतच पुन्हा हा प्रकार घडला आहे.
संजय हिरामण पाटील (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो देवद परिसरात राहतो. या प्रकारानंतर निवडणूक आयोगाकडून आतापर्यत मागील २ दोन दिवसात ४ जणांना अटक केल्याचे सांगण्यात आले.
या कार्यकर्त्याविरुध्द खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक भरारी पथक प्रमुख विनोद श्रीरामजी माहोरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. दरम्यान, पनवेलच्या कामोठ्यात आणि सुकापूरमध्येदेखील असाच प्रकार पहायला मिळाला होता.
विशेष म्हणजे गेल्या २ दिवसांत राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यापाठोपाठ आता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडण्यात आले आहे.