रायगड - यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर वाळू तस्करांनी जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्याकडून आज एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. वाळू तस्करांवर तत्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी, जिल्हा खनिज निधीमधून सशस्त्र सुरक्षा रक्षक द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव याना देण्यात आले. या आंदोलनाला चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी देखील पाठिंबा दिला.
नायब तहसीलदारावर हल्ला
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील तहसीलदार कार्यालयात वैभव पवार हे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. याठिकाणी अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती वैभव पवार यांना मिळाली होती. त्यामुळे वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी वैभव पवार हे तलाठ्यांसोबत गेले होते. दरम्यान कर्तव्य बजावत असताना वाळू माफिया अविनाश चव्हाण याने पवार यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात पवार हे गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आज रजा आंदोलन
उमरखेड येथे झालेल्या घटनेबाबत आज राज्यभरात तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेतर्फे एक दिवसांचे रजा आंदोलन करण्यात आले. राजगड जिल्ह्यातील 3 उपजिल्हाधिकारी, 20 तहसीलदार आणि 55 नायब तहसीलदार हे रजा घेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. संघटनेच्या वतीने यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांना देण्यात आले. शासनाने मागण्यांकडे लक्ष न दिल्यास 8 मार्चपासून काम बंद आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
महसूल कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ
राज्यात अवैध वाळू उत्खनन होत असल्याने, महसूल विभागाकडून कारवाईची पावले उचलली जातात. मात्र अनेकवेळा तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, महसूल अधिकारी यांच्यावर वाळू माफियांकडून हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महसूल यंत्रणेचे खच्चीकरण होत आहे. सरकारने याविरोधात कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी करण्यात येत आहे.
या आहेत मागण्या
वैभव पवार यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करून कारवाई करावी, जिल्हा खनिज निधीमधून सशस्त्र सुरक्षा रक्षक पुरवा या प्रमुख मागण्यांसह नायब तहसीलदारांना ग्रेड पे द्यावे, अंतिम जेष्ठता यादी प्रसिद्ध करावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.