रायगड - निसर्ग चक्रीवादळाने नागरिकांचे, बागायतीचे करोडोंचे नुकसान झाले. असे असताना लाखो विद्यार्थी ज्या जिल्हा परिषद शाळेत आपले भविष्य घडवत आहेत. त्या अडीच हजार शाळांपैकी दीड हजार शाळा, 1 हजार 50 अंगणवाडी तर 186 माध्यमिक शाळांचे वादळाने पत्रे उडून, भिंत पडून अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये निसर्ग वादळाने नुकसान केल्याने विद्यार्थ्यांचे वर्ग मोडून पडले आहेत. त्यामुळे शाळा सुरू होण्याचे शासनाने आदेश दिले असताना जिल्ह्यातील जिल्हा परिषद मोडक्या शाळेत विद्यार्थी पावसाळ्यात शिक्षण कसे घेणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर शाळा दुरुस्तीसाठी निधी आलेला नसताना शाळा सुरू कशा करायच्या हा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर येऊन ठाकला आहे.
निसर्ग चक्रीवादळाचा फटका हा जिल्हा परिषदेच्या शाळांना बसला असून यात अडीच हजार शाळांपैकी 1 हजार 501 शाळांचे अंशतः नुकसान झाले. तर, 51 शाळा ह्या पूर्णपणे कोसळल्या आहेत. शाळेचा पहिला कित्ता गिरविण्याची सुरुवात होणाऱ्या 1 हजार 350 अंगणवाड्याही या वादळाने मोडून टाकल्या आहेत. 186 अनुदानित, विनाअनुदानित शाळांचेही नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या साधारण 3 हजार शाळांचे नुकसान झाले आहे. यात जिल्हा परिषदेच्या दीड हजार शाळांचे 37 कोटी, अंगणवाडी 13 कोटी तर खाजगी शाळांचे 6 कोटी इतके नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच खाजगी माध्यमिक शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निसर्ग चक्रीवादळाने या शाळा मोडकळीस आल्याने पावसाळ्यात शाळांमध्ये गळती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातील 51 शाळा पूर्णतः मोडकळीस आल्या असून तेथील विद्यार्थ्यांच्या पुढे शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या तीन हजार शाळांचे निसर्गमुळे नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यायचे हा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
याबाबत, शिक्षण व आरोग्य सभापती सुधाकर घारे म्हणाले, 'निसर्ग चक्रीवादळाने जिल्हा परिषदेच्या शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शाळांच्या दुरुस्तीकरता लागणाऱ्या निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. कोरोना प्रादुर्भाव नसणाऱ्या भागात शाळा सुरू करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. त्यानुसार ज्या ठिकाणी शाळा नादुरुस्त झाल्या आहेत त्याठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडसर येणार नसून त्याची शासकीय इमारत अथवा इतर ठिकाणी व्यवस्था केली जाईल.'