रायगड - निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील सुपारी आणि नारळाच्या बागा नेस्तनाबूत झाल्या. त्यामुळे सुपारी व नारळाच्या उत्पन्नावर पुढील दहा वर्षे मोठा परिणाम होणार आहे. जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील रोटा तर अलिबाग, मुरुडमधील सुपारीला बाजारात चांगली मागणी होती. मात्र, निसर्ग चक्रीवादळाने सुपारीची झाडे नष्ट झाल्याने सुपारी आता चांगलाच भाव खाणार आहेत. परंतु, बागायतदार शेतकरी मात्र अडकीत्यात अडकला आहे.
अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या भागात नारळ फोफळीच्या विस्तीर्ण बागा होत्या. नारळ सुपारीच्या बागावर आमचा चरितार्थ सुरू होता. मात्र, निसर्ग चक्रीवादळाने तीन तासात नारळ फोफळीच्या बागायतदारांना रस्त्यावर आणले. नारळ, सुपारीतून करोडोचे उत्पन्न मिळत होते. मात्र, आता पुढील दहा ते बारा वर्ष आम्ही या उत्पन्नापासून वंचित राहणार आहेत, असे सुपारी महासंघाचे अध्यक्ष कबन नाईक यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... 'केंद्राकडून रुपयाचीही मदत नसताना राज्य सरकारकडून रायगडला पाऊणे चारशे कोटींचे पॅकेज'
पुढील दहा वर्षे तरी सुपारीचे उत्पन्न घटणार...
रायगड जिल्ह्याच्या अलिबाग ते श्रीवर्धन समुद्र किनारपट्टीवर नारळ सुपारीच्या बागा आहेत. जिल्ह्यात सुपारीचे उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वर्षाला वीस ते पंचवीस कोटींची उलाढाल सुपारीच्या फळातून होत असते. जिल्ह्यातील सुपारी बागायतदार स्वतः अथवा व्यापाऱ्यांमार्फत सुपारी वाशी येथे बाजारात विक्रीसाठी पाठवतात. त्यामुळे येथील सुपारी बागायतदार हा सधन बनला आहे. मात्र, निसर्ग चक्रीवादळाने सुपारी बागायतदारांची झाडे कोलमडून पडली. त्यामुळे नव्याने सुपारीच्या बागा तयार होत नाही, तोपर्यत पुढील दहा वर्षे तरी सुपारीचे उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनमधील सुपारी बागायतदारांची अवस्था ही अडकीत्यात अडकलेल्या सुपारीसारखी होणार आहे. त्यातच बाजारात सुपारीची आवक घटल्यानंतर हीच सुपारी मात्र चांगलाच भाव खाऊन जाईल, असे बोलले जात आहे.
नारळही खाणार भाव...
सुपारी सोबत निसर्ग चक्रीवादळाने नारळाची झाडेही मुळासकट उन्मळून काढली आहेत. जिल्ह्यात नारळाचे वार्षिक उत्पन्न हे साधारण 20 ते 25 कोटीच्या घरात आहे. वादळाने नारळाच्या लांबच लांब आलेल्या बागा ह्या पूर्णतः नेस्तनाबूत केल्या आहेत. त्यामुळे पुन्हा नारळ बाग फुलवण्यासाठी दहा वर्षाचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत बागायतदार यांना नारळाच्या उत्पन्नपासून वंचित राहावे लागणार आहे. नारळाचे किसलेले खोबरे हे कोकणातील माणूस भाजी, डाळ यामध्ये वापरात असतो. मात्र, जिल्ह्यातील नारळाचे उत्पन्नही आता कमी होणार असल्याने भाजी, डाळीला लागणारा नारळही भाव खाऊन जाणार आहे. त्यामुळे भविष्यात नारळाचे भावही काही दिवसात गगनाला भिडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
हेही वाचा... जिल्हा परिषद अन् अलिबाग तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव
बनारसी, कलकत्ता, मसाले पान आणि इतर खायच्या पानांमध्ये कच्ची, पक्की, कातरलेली सुपारी हा एक महत्वाचा घटक असतो. मात्र, आता हीच सुपारी काही दिवसानंतर महाग होणार असल्याने पान खाणाऱ्यांना सुपारीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. याचे कारण, निसर्ग चक्रीवादळात या शेतीचे संपुर्ण गणित बदलले आहे.