रायगड - 24 ऑक्टोबरला विधानसभेचा निकाल लागेल तेव्हा आमचेच आनंदाचे व विजयाचे फटाके फुटतील. मेगा भरतीची आम्हाला फिकिर नाही. कारण शिवसेना भाजपला लोकसभेत एवढे बहुमत मिळूनही ते आयाराम गयारामच्या जीवावर राज्यात सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न बघत आहेत. यातच आमचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता समारोपासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महाड येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली.
जनतेला शिवसेना भाजप सरकार नको आहे
आमदार जयंत पाटील म्हणाले, की 24 ऑक्टोबरला निकाल लागेल तेव्हा आम्हीच फटाके फोडू. महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना भाजप सरकार नको आहे. आम्ही निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना, तरुणांना, महिलांना संधी देत आहोत. 80 वर्षाचा तरुण नेता शरद पवार हे परत मैदानात उतरले असून त्याच्या मागे जनता आहे. जनतेला आयाराम गयाराम यांचे सरकार नको आहे. जनतेला निष्ठेने राहिलेल्या तत्वाशी चिकटलेल्या माणसांनाच निवडून द्यायचे आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
हेही वाचा - जनता युती सरकारला त्रासली असून आम्हाला पुन्हा सत्तेत बसवणार - बाळासाहेब थोरात
मेगा भरतीची फिकीर नाही
भाजप शिवसेनेत मेगा भरती होत असली तरी त्याची आम्हाला फिकिर नाही. नगाला नग तयार होत आहेत. जे गेले त्याठिकाणी नवीन पर्याय उभे केले आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण नाही. शरद पवारांचा विचार खाली पडू देणार नाही. शिवसेना भाजपत गेलेल्यांना जनताच खड्यासारखी बाजूला करेल. अजूनही काही जण पक्ष सोडतील पण नवीन रक्ताची नवी फौज तयार होईल.
हेही वाचा - समाजस्वास्थ बिघडवणाऱ्या भाजपला 'चले जाव' म्हणायची वेळ - शरद पवार