रायगड- जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून, पराभवाच्या कारणांचा आम्ही शोध घेवू, अशी प्रतिक्रिया शेकापचे पराभूत उमेदवार हरेश केणी यांनी दिलीये. पनवेल विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रशांत ठाकूर हे विक्रमी मताधिक्याने विजयी झाले त्यांनी शेकापच्या हरेश केणी यांचा जवळपास 92 हजार 370 मतांनी पराभव केला आहे. प्रशांत ठाकूर यांनी एक लाख मताधिक्य मिळवण्याचे ध्येय ठेवले होते. त्यांनी अपेक्षेप्रमाणे 91 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली.
शेकापने शेवटच्या टप्प्यात उमेदवारी दिल्यामुळे प्रचार करण्यासाठी कमी वेळ मिळाला होता,असे मत हरेश केणी यांनी व्यक्त केले. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त प्रयत्न केले. मी आमदार म्हणून जरी निवडुन आलो नाही, तर मी एक नगरसेवक देखील आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाण्यासरख्या अनेक प्रश्नांवर अद्याप तोडगा काढला नसून, त्याविरुद्ध मी माझा लढा सुरूच ठेवणार असल्याचे हरेश केणी यांनी सांगितलं. हरेश केणी यांच्या पराभवामुळे शेतकरी कामगार पक्षाला एक मोठा झटका बसला आहे. एकेकाळी शेकापमध्ये असलेल्या प्रशांत ठाकूर यांनी पक्षातून बाहेर पडत कॉंग्रेसमधून २००९ साली तर भाजपामध्ये २०१४ साली आमदारकी पटकावली होती. या दरम्यान त्यांनी केलेल्या कामांमुळे प्रशांत ठाकूर यांचे पारडे जड होते.
महापालिकेच्या कारभारावर नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असतानाही विरोधी पक्ष म्हणून शेकाप नागरिकांच्या अपेक्षेनुसार काम करून समर्थ पर्याय म्हणून उभा राहून शकला नाही. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेला पनवेल विधानसभा मतदारसंघ भाजपाने काबिज केला आहे. पक्षाची चुकलेली ध्येयधोरणे, पारंपारिक पद्धतीने बदल करण्यात दाखवलेली उदासिनता, बाहेरुन आलेल्या लोकांची मने जिंकण्यात आलेले अपयश, पक्षात स्थानिक प्रकल्पग्रस्तांचाच बोलबाला या कारणांमुळे शेकापला पनवेल शहरात उतरती कळा लागली आहे.