रायगड - मुरुड, नांदगाव समुद्र किनाऱ्यावर आज एक विलक्षण घटना घडली. समुद्राच्या लाटेमधून फेसाचे गोळे तयार होऊन ते समुद्रकिनारी, शहरातील बाजारपेठेत उडाले. समुद्र किनारी उडत असलेल्या या फेसाचा आनंद लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी घेतला. मात्र समुद्रामधून अचानक फेस बाहेर येत असल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनला. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटेतून उडालेले हे फेसाचे गोळे खडकातील द्रव्य आणि पाण्याच्या घर्षणाने तयार झाले आहेत. समुद्रात झालेल्या दोन चक्रीवादळामुळे ही घटना घडली असल्याचे समुद्र अभ्यासक उदय खोत यांनी सांगितले. समुद्राच्या लाटेतून निर्माण झालेला असा फेस नागरिकांना पहिल्यांदाच अनुभवायाला मिळाला.
मुरुड आणि नांदगाव समुद्र किनाऱ्यावर फेसाचे गोळे उडत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर नांदगाव ग्रामस्थांनी हे दृश्य पाहाण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर धाव घेतली. समुद्राच्या लाटेमधून उडत असलेले हे फेसाळ गोळे लहान मुले पकडण्याचा प्रयत्न करत होते. समुद्रकिनाऱ्यासह शहरातील रस्त्यांवरही हे फेसाळ गोळे वाऱ्यामुळे उडून आले.
चक्रीवादळाचा परिणाम
नांदगावमधील समुद्र अभ्यासक, शिक्षक उदय खोत यांनी हे फेसाळ गोळे कसे निर्माण झाले याबाबत माहिती दिली आहे. समुद्र किनारी असलेल्या तपकिरी खडकात कार्बनीक द्रव्य असते. या द्रव्यांमध्ये प्रोटीन लिनीन किंवा लिपिड असे घटक असतात. समुद्राच्या पाण्याचे मंथन झाल्याने खडकातील या द्रव्याचे म्हणजे खारे पाणी आणि गोडे पाणी यांचे घर्षण होऊन, हे फेसाळ गोळे तयार झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात दोन चक्रीवादळ झाले. चक्रीवादळाच्या परिणामामुळे ही प्रक्रिया घडली असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - प्रताप सरनाईकांचे पत्र हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न - फडणवीस