रायगड : मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग मांडावा समुद्री मार्गावर आजपासून वॉटरटॅक्सीला ( Mumbai to Alibaug water taxi ) सुरुवात करण्यात (water taxi starting from today ) आली आहे. पारंपरिक बोटीने 3 तास लागणाऱ्या प्रवास आता 45 मिनिटात करणे आता शक्य होणार आहे. यामुळे कोकण पर्यटन आणि व्यवसायाला भरारी मिळणार आहे.
एकाचवेळी 199 प्रवाशांची वाहतूक - रस्त्यांवरील रहदारीचा ताण कमी करण्यासाठी आणि जलदगतीने प्रवास होण्यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू असून, भाऊचा धक्का ते बेलापूर बेलापूर ते जेएनपीटी आणि बेलापूर ते एलिफंटा अशा तीन मार्गांवरील वॉटर टॅक्सी सेवेला सुरुवात झाली होती. तर आज पासून मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग, मांडावा वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. एकावेळी 199 प्रवाशांची वाहतूक या सेवेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असणार प्रवासी व्यवस्था - पारंपारिक पद्धतीच्या बोटीपेक्षा जलद गतीने हा प्रवास आता शक्य होणार असून, ही वॉटरटॅक्सी दुमजली असून, तळमजल्यावर 139 प्रावाशी बसण्याची सुविधा आहे. यासाठी 400 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. तर वरच्या मजल्यावर 60 प्रावाशी बसण्याची व्यवस्था असून, यासाठी 450 रुपये मोजावे लागणार आहेत.
कोकण मुंबईच्या अधिक जवळ येणार - भाऊचा धक्का ते मांडावा दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या वॉटरटॅक्सी सेवेमुळे कोकणातील पर्यटन आणि व्यवसाय वाढीला चालना मिळणार आहे. तर जलद गतीने प्रवास होणार असल्याने, कोकण मुंबईच्या अधिक जवळ येणार आहे. यामुळे अलिबागसारख्या पर्यटन स्थळालाही महत्व निर्माण होणार असून, व्यवसायाचे मार्गही खुले होणार आहेत.