रायगड - मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात योग्य ती सुधारणा न केल्यास गुन्हा दाखल करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा निर्वाणीचा इशारा खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे ते कोलाड या दरम्यानच्या रस्त्याचे, पुलाचे, वळणाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. गेल्यावर्षी अधिकाऱ्यांना कामाबाबत सूचना करूनही अमलबजावणी करण्यात आलेली नाही याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी नॅशनल हायवेचे अधिकारी यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.
नागोठणे ते कोलाड महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे
मुंबई गोवा महामार्गाचा पहिला टप्पा हा पळस्पे ते इंदापूर असा आहे. पळस्पे ते इंदापूर या महामार्गावरील 90 टक्के काम पूर्ण झाले असले तरी 10 टक्के कामात उणिवा राहिल्या आहेत. याबाबत आज खासदार सुनील तटकरे यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. आंबेवाडी नाका, गोदी पूल, कुंडलिका नदीवर पाच वर्षांपूर्वी पूल बांधला आहे. त्याठिकाणी भगदाड पडू लागले आहे. पुलाचे काम सुरू असताना टाकलेल्या कॉपर डॅममुळे काही गावांना पुराचा धोका वाढलेला आहे. नागोठणे वाकण नाक्यावरील रस्त्याच्या चुकीच्या नियोजनामुळे स्थानिक व्यवसायिकाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. पाण्याचा निचरा होणे गरजेचे असताना अभियंत्यांनी ती खबरदारी घेतलेली नाही. महामार्गाचे काम सुरू असताना आठ ते दहा जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्याची कानउघडणी केली आहे. योग्य पद्धतीने काम करण्यात आले नाही तर नॅशनल हायवे अधिकाऱ्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करू, असा इशाराही खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी दिला आहे.
अन्यथा गुन्हा दाखल करू
मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत गेल्यावर्षी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. मात्र, याची अमलबाजवणी झालेली नाही. नागोठणे ते कोलाड दरम्यान झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे कामाचा दर्जा सुधारला नाही तर कायदेशीर कारवाई करावी लागेल. काही निधीची कमतरता असेल तर याबाबत खासदार म्हणून मी संबंधित मंत्र्यांशी बोलेन. धोकादायक व अपघात प्रवण क्षेत्राची कामे त्वरित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणारा हॉटेल व्यावसायिक!