पेण (रायगड) - पेण तालुक्यातील पाटणोली येथे रायगड जिल्हा तलाठी भवनाची इमारत दिमाखात उभी राहणार आहे. सदर नियोजित इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. पेण येथील तलाठी भवन इमारतीसाठी 50 लाख निधी देणार असल्याचे यावेळी सुनिल तटकरे यांनी जाहीर केले.
400 सभासदांनी वर्गणी काढून 33 लाख रुपये जमा - सदरच्या इमारतीच्या भूखंडा करिता संघटनेच्या 400 सभासदांनी वर्गणी काढून 33 लाख रुपये जमा करून साडेसहा गुंठे बिनशेती जागा घेतली आहे. या भूखंडावर भविष्यात दोन माळ्याची इमारत उभारण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर तलाठी संघटनेचे कार्यालय व प्रशस्त हॉल बांधण्यात येणार आहे. तर दुसऱ्या मजल्यावर तलाठी संघटनेची पतसंस्था तसेच कामानिमित्त येणाऱ्या तलाठ्यांच्या निवासा करिता 4 खोल्या बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष जांभळे यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले की, रायगड जिल्हा तलाठी भवनाच्या नियोजित इमारती करीता आमदार अनिकेत तटकरे यांच्या निधीतून 15 लाख रुपयांचा निधी दिला असून, खासदार निधीतूनही 50 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करून उपलब्ध करून देण्यात येईल. खा.सुनिल तटकरे यांच्या हस्ते सदर नियोजित इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या ईमारतीचे काम आमदार अनिकेत तटकरे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत निधीतून करण्यात येणार आहे. परंतु सदरचा निधी कमी पडणार असल्याने खासदार निधीतूनही मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यांची होती उपस्थिती - भूमिपूजन सोहळ्याला रायगड जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष संतोष जांभळे, माजी तहसिलदार बाबूराव निंबाळकर, सरचिटणीस वल्लभ मसके, सर्कल सूर्यवंशी, तलाठी सुरेंद्र ठाकूर, विलास म्हात्रे, विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, नगरसेवक निवृत्ती पाटील, नगरसेविका वसुधा पाटील, विकास म्हात्रे यांच्यासह मान्यवर व जिल्हयातील तलाठी, सर्कल, कोतवाल आदी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.