रायगड : सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा देण्याबाबात मनसेने आंदोलन छेडले आहे. यासाठी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शेलू ते नेरळ असा विनातिकीट, विना परवानगी प्रवास केला होता. यामुळे त्यांच्या विरोधात कर्जत लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संदीप देशपांडे, संतोष धुरी, अतुल भगत, गजानन काळे या चौघांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे.
कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत असलेल्यांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र इतर सर्व सामान्य नागरिकांना अद्यापही रेल्वे प्रवास करण्यास शासनाने मुभा दिलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चार ते पाच तास बस प्रवास करून कामाच्या ठिकाणी जावे लागत आहे. याबाबत मनसेने सविनय कायदे भंग आंदोलन हाती घेतले होते.
21 सप्टेंबर रोजी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत रेल्वे स्थानकावर आंदोलन केले होते. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता. देशपांडेंनी यावेळी आपण 'सविनय कायदेभंग' करत असल्याचे सांगत, रायगड जिल्ह्यातील शेलू स्थानकावरून नेरळ असा विनातिकीट, विनापरवानगी रेल्वे प्रवास केला. त्यानंतर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी सविनय कायदेभंग केल्याबाबत देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज देशपांडे याना कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन, साताऱ्याच्या प्रतिभा रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास