रायगड - पेणमधील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील खटला हा जलदगती न्यायलायत चालविणार आहे. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांनी हा खटला लढवावा, अशी विनंती सरकारतर्फे केली जाणार असल्याची माहिती गृह (ग्रामीण) आणि वित्त राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली. पीडित मुलीच्या कुटुंबाला घरकुल योजनेतून घर दिले जाणार असल्याचेही राज्यमंत्री देसाई यांनी सांगितले. शक्य झाल्यास आरोपीवर मोक्काचीही कारवाई केली जाणार असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे.
पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा
गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेटगृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज पेण येथे मळेघरवाडी येथे जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबाची सांत्वन पर भेट घेतली. यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस महासंचालक उपस्थित होते. गृह राज्यमंत्री यांनी कुटुंबाची भेट घेतल्यानंतर पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली.
'निकम यांनी हा खटला लढवावा'
पेणमधील हे बलात्कार आणि हत्याप्रकारण जलदगती न्यायलायत चालविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यानी हा खटला चालवावा, अशी विनंती मी आणि गृहमंत्री अनिल देशमुख करणार आहोत. राज्य शासनाकडून निकम यांनी हा खटला लढवावा, अशी तयारी केली आहे. त्यामुळे शासनाच्या विनंती अॅड. उज्वल निकम मान्य करतील, असे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पीडित कुटुंबाला शासनाच्या योजनेतून देणार घर
पीडित मुलीच्या कुटुंबाच्या घराला दरवाजाही नाही. झोपडीत हे कुटूंब राहत आहे. त्यामुळे या कुटुंबाला शासनाच्या विविध असलेल्या घरकुल योजनेतून घर बांधून दिले जाणार आहे. ही जबाबदारी शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदार उचलतील, असे देसाई यांनी म्हटले आहे.