रायगड - तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या. नुकसानीचे पंचनामे करताना घाई करू नये, नागरिकांचे जेवढे नुकसान झाले आहे, त्याची नोंद करा. शासनाकडे अहवाल पाठविताना जेवढे नुकसान झाले आहे, ते तंतोतंत पोहोचणे गरजेचे आहे, अशा सूचनाही दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचेही काही ठिकाणी नुकसान झाले आहे. आरोग्य केंद्र त्वरित दुरुस्त करण्यासाठी जिल्हा नियोजन, एन. डी. आर. एफ.मधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे ही त्या म्हणाल्या.
तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या अलिबाग तालुक्यातील गावांना त्यांनी भेट देऊन पाहणी केली. उसर, खानाव, कुरुळ, मल्याण, वाडगाव येथे जाऊन नुकसानीची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधून माहिती दिली. यावेळी अलिबाग मुरुड विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, राजीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसीलदार सचिन शेजाळ, महसूल, कृषी अधिकारी उपस्थित होते.
उसर खानाव येथील पाणी टाकीच्या नुकसानीची केली पाहणी -
अलिबाग तालुक्यातील खानाव येथे तीन गावांना पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी वादळात पडली. तटकरे यांनी या टाकीची आणि गावातील घरांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर वेंगुर्लेकर याना नवीन टाकीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर उसर, खानाव, मल्याण, कुरुळ गावातील घरांच्या नुकसानीची पाहणी केली.