पनवेल - मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना सर्वाधिक मतांनी विजयी करण्याचा निर्धार पनवेल काँग्रेसने केला आहे. पार्थ पवार हेच मावळ मतदारसंघातून निवडून येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मात्र, पनवेलमधून त्यांना जास्त मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असे आवाहन पनवेल शहर जिल्हा काँग्रेस आणि पनवेल तालुका काँग्रेस कमिटीने केले आहे.
सोमवारी पनवेलमध्ये पनवेल शहर जिल्हा आणि पनवेल तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप व मित्रपक्ष महाआघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवून येत्या १५ दिवसात प्रचाराचे रान उठवू, असा निर्धार या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला.
लष्करी कारवाईचे राजकीय भांडवल करून भाजप पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु नागरिक आता त्यांना सोडणार नाहीत. या निवडणुकीत भाजप सरकारचा सुपडा साफ होईल, असे यावेळी अनेकांनी नमूद केले. काँग्रेसचे पनवेल महानगरपालिका कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी प्रास्ताविक करून भाजप केंद्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराबद्दल ताशेरे ओढले. तसेच कार्यकर्त्यांनी बूथ लेवलवर काम करावे. बूथ कमिटी आणि बीएलो यांनी कशा पद्धतीने काम करावे याबाबत माहिती दिली.
बैठकीला पनवेल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, काँग्रेसचे पनवेल महानगरपालिका कार्याध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष महादेव कवठेकर, अनंतराव पाटील, वसंत काठवले, निर्मला म्हात्रे, शशिकला सिंह, भरत म्हात्रे, बशीर शेख, गणेश म्हात्रे, सुदेश नारायण, प्रकाश पाटील, हेमराज म्हात्रे, त्रिंबक केणी, विजय केणी, प्रेमा आपाची, श्रावण भल्ला, के एस पाटील, आबा खेर, माया आहिरे, रघुनाथ पाटील, राजीव चौधरी, कॅप्टन कलावत, गोविंद पाटील, अभिजित पाटील, सदानंद शेट्टी, कलावती माली, जयश्री खटकल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.