रायगड - मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी, यासह विविध मागण्यांसाठी आज रायगड जिल्ह्यातील मराठा समाज एकवटला होता. तहसीलदार कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. तहसीलदाराच्या माध्यमातून मराठा समाजाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मागण्यांचे एक निवेदन दिले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत विधिज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही स्थगिती उठवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी मराठा समाजाची आहे. यासाठी आंदोलकांनी तहसील कार्यालयाबाहेर बसून ठिय्या आंदोलन केले. यावेळी जय शिवाजी, जय भवानी, एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही देण्यात आल्या.
मराठा समाजाला आरक्षण द्या, कोपर्डी, रोहा तांबडी येथील पीडित मुलींच्या आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवा, एसईबीसी प्रवर्गातील घटकांना व विद्यार्थ्यांना ज्या सवलती आहेत त्या सुरू ठेवाव्यात, राज्य लोकसेवा आयोगात निवड झालेल्या मराठा उमेदवारांना शासन सेवेत सामावून घ्या, सारथी संस्थेला भरघोस निधी द्या, मनुष्यबळ गतिमान करा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून दिलेल्या कर्जावर व्याज परताव्यासाठी बजेटमध्ये तरतूद करा, मंत्रिमंडळ समिती कार्यक्षेत्रात वाढ करावी तसेच डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता, समांतर आरक्षण याचाही समावेश करावा, मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घ्या, शासनाने पोलीस भरतीत मराठा समाजाच्या तरुणांबाबत काय निर्णय घेणार हे जाहीर करावे, या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्षांकडे सोपवा आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.