रायगड - राज्यातील विरोधकांकडे विरोध करण्याशिवाय काहीच काम उरलेले नाही. त्यामुळे त्यांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करावी. आम्ही जनतेचे सेवक असून जनतेची अविरत सेवा करत राहणार आहोत, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. मुरुड तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आणि मदत वाटपासाठी आज (शनिवार) खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे रायगडमध्ये आले होते. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.
राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार हे दडपशाहीचे सरकार नसून लोकशाहीचे सरकार आहे. त्यामुळे आम्ही प्रशासनाच्या मदतीने नागरिकांची सेवा करत राहू आणि विरोधकांना टीका करण्याची मुभा असून त्यांनी मनमोकळ्यापणे आणि दिलदारपणे टीका करावी, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... "ज्यांना जनतेने नाकारलं त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही"
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीसह विविध भागात कोट्यवधींची वित्तहानी झाली. यातून सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांनी पाहणी दौरे करून नुकसानग्रस्त नागरिकांना आधार दिला. शनिवारी पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार यांनी केली असून तातडीने मदतही दिली आहे. राज्य सरकारकडून निधीची कमतरता पडणार नाही. खासदार सुनील तटकरे यांनीही केंद्राकडे निधीची मागणी केली आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
चक्रीवादळाने अनेक घरांचे आणि शाळांचे पत्रे उडून गेले. नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय, अंजुमन इ इस्लाम हायस्कुल, नडगाव शाळा याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअरमार्फत पत्रे आणि इतर मदतीचे वाटप खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.