रायगड - भोर - पुणे महामार्गावर वाघजई घाटात बिबट्याच्या जोडीचे दर्शन झाले आहे. वाघजई घाटात डोंगरावर चढत असताना आणि दरीत खाली पळताना बिबट्याचा व्हिडिओ महाड बिरवाडी येथील कल्पेश सागवेकर या तरुणाने चित्रीत केला आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटेनेबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा वरंध घाट महामार्ग हा पावसाळ्यात प्रवासासाठी नयनरम्य आहे. घाट मार्ग आणि जंगल भाग यामुळे येथील परिसरात वन्य प्राण्याचा वावर पाहायला मिळत असतो. या महामार्गावर बिबट्याचे दर्शन हा एक वेगळाच अनुभव समोर आला आहे. महाड बिरवाडी येथील कल्पेश सागवेकर हा आपल्या मित्रांसोबत बाईकद्वारे 17 जून रोजी वरंध घाटात पर्यटनास गेला होता. सायंकाळच्या सुमारास महाडकडे परतत असताना तो निसर्गाचे चित्रीकरण करत होता. तो वरंध घाटातील वाघजई येथे आला असता त्याच्या मोबाईमध्ये दोन बिबट्ये कैद झाले आहेत.
यापूर्वी देखील अनेकवेळा आढळला बिबट्या
वरंध घाटात या आधीही बिबट्याचे दर्शन झाल्याचे बोलले जात आहे. 2020 साली बिबट्याने या परिसरातील एका नागरिकासोबतच पाळीव प्राण्यांवर देखील हल्ला केला होता. शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकून दोन वर्षांपूर्वी एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडली होती. त्यामुळे या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असल्याची चर्चा आहे. दरम्यान वनविभागाकडून नागरिकांना सर्तक राहाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - ठाण्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा पत्नीनेच केला खून; पत्नीसह प्रियकरालाही अटक