रायगड - मुळशी व कोयना या धारणांमधून कोकणात येणारे पाणी अन्यत्र वळविण्याचा राज्यशासनाने घाट घातला आहे. त्याला आम्ही विरोध करणार असून राज्यशासनाचे प्रयत्न कदापी यशस्वी होऊ देणार नसल्याचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी आज स्पष्ट केले आहे.
खासदार सुनील तटकरे नियोजन समितीच्या बैठकीसाठी शनिवारी अलिबागला आले होते. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पाणी वाटपासंदर्भात आपली भूमिका मांडली होती.
कोयना व मुळशी धरणातील पाणी कोकणाव्यतिरिक्त अन्यत्र वळविण्यास उपाययोजना करऱयासाठी शासनाकडून एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे.
कोयना धरणतील पाणी चिपळूण येथे वशिष्टी नदित सोडले जाते. मुळशी धरणातील पाणी रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीत सोडले जाते. मुळशी धरणावर टाटाचा वीजप्रकल्प आहे. त्यातून येणार्या पाण्यातून रवाळजे आणि डोलवाहळ येथे वीज तयार केली जाते. या नद्यांचे पाणी उद्योग, शेती तसेच पिण्यासाठी वापर केले जाते. परंतु आता हे पाणी अन्यत्र वळविण्याचा सरकारने घाट घातला आहे. कोकणाचे हक्काचे पाणी कोकणालाच मिळाले पाहिजे. हे पाणी कोकणाव्यतिरिक्त अन्यत्र वळविण्यास आमचा ठाम विरोध आहे. मुळशीच्या पाण्यावर टाटाचा वीजप्रकल्प आहे. पाण्यावर वीज निर्मिती करणारा हा प्रकल्प बंद करण्याचा सरकाचा प्रयत्न आहे. त्याला आमचा विरोध आहे, असे तटकरे यांनी सांगितले.
रेसव - रेड्डी सगारी महामार्गांला क्रमांक मिळवून तो मार्ग पूर्ण करणे. कोकण रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम करणे, रेवस - करंजा पूल बांधणे, मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात करून घेणे, पेण - आलिबाग रेल्वे मार्गाचे काम, विरार - आलिबाग कोरिडोर, कोलाड, अष्टमी येथे कोकण रेल्वे मार्गावर उड्डाण पूल बंधणे, या कामांना मी प्राधन्य देणार असल्याचे खासदार तटकरे यांनी यावेळी सांगितले.
ज्याप्रमाणे मुबई - नागपूर सुपर एक्प्रेस महामार्ग बांधण्यात आला आहे तसाच कोकणासाठी देखील मुंबई - सावंतवाडी असा सुपरएक्प्रेस महामार्ग बांधावा अशी मागणी आपण केंद्राकडे करणार आहोत, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या प्रकल्पांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी अन्यत्र जिल्ह्यात खर्च करण्याचा आदेश केद्रीय अवजड उद्योग विभागने दिले आहेत. त्याची कारणे शोधणार असून आरसीएफ चा थळ येथील तिसरा टप्पा रद्द करण्यात आला आहे. तो व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.