उऱण (रायगड) - उरणमध्ये दोन महिन्यांच्या बाळाला डोस देण्याचा कांगावा करत एक महिला आणि पुरुष साथीदाराने पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील नवघर गावामध्ये राहणाऱ्या राजभर कुटुंबातील दोन महिन्यांच्या मिताली राजभर या चिमुकलीचे अपहरण केले आहे. डोस देण्यासाठी बाळाला रुग्णालयात न्यायचे आहे असे सांगून बाळाला पळविण्यात आला. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे.
बाळाला पळवून नेणारी महिला आणि पुरुष साथीदार हे एका रिक्षांमधून आले असून, या रिक्षाचा शोध घेण्यात येत आहे. तर परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासण्यात येत आहेत.
संपूर्ण तालुक्याची नाकाबंदी -
आज सकाळच्या सुमारास तोतया रुग्णसेवक बनून आलेल्या एका महिला आणि पुरुष साथीदाराने उरणमधील राजभर कुटुंबाच्या घरात प्रवेश केला. तुमच्या बाळाला डोस द्यायचा असून, बाळाला रुग्णालयात न्यावे लागेल, असा बनाव केला. या बनावाला हे कुटुंब बळी पडून अवघ्या दोन महिन्यांच्या बाळाला या तोतया रुग्णसेवकांच्या हाती दिले. या जोडप्याने तात्काळ रिक्षांमधून बाळाला घेऊन पोबारा केला. काही वेळातच या कुटुंबाला आपल्या बाळाला पळवून नेल्याचे लक्षात आले. या धक्कादायक घटनेची माहिती पोलीस ठाण्यात मिळताच, संपूर्ण तालुक्याची नाकाबंदी करण्यात आली आहे. तर पोलीस बिटमार्शलही सक्रिय झाले असून, संशयित व्यक्ती अथवा रिक्षा दिसल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर पोलीस या जोडप्याचा कसून तपास करत आहे.
बाळाची चोरी कुणी आणि कशासाठी केली याचा तपास सुरू -
दोन महिन्यांच्या बाळाला पळवल्याच्या घटनेमुळे मुले पळवणारी टोळी येथील भागात सक्रिय झाली असल्याचे समोर आले आहे. तरी नागरिकांनी आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान आज पळवण्यात आलेल्या बाळाची चोरी नक्की कुणी आणि कोणत्या उद्देशाने केली असावी, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.