पनवेल (रायगड)- एरवी पोलीस ठाणे म्हटले की, सामान्य माणसाच्या मनात भीती दाटून येते. मात्र, या सगळ्याला कळंबोली पोलीस ठाणे अपवाद ठरले आहे. याठिकाणी तक्रारदाराचे स्वागत करण्यासाठी २ पोलीस हातात पाण्याची बॉटल आणि गूळ घेऊन उभे असतात. उन्हाळ्यामुळे तक्रादारांची काळजी घेण्यासाठी मंगळवारपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
गेल्या ७ एप्रिलला सकाळी ९ वाजतापासून ते रात्री १० वाजेपर्यंत कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये स्वागत अन् गप्पाटप्पा, असे हलकेफुलके वातावरण होते. तक्रार घेऊन येणाऱ्यांची आस्थेने विचारपूस होत होती. तेवढ्याच सहजपणे त्याची तक्रार, समस्या मार्गी लावण्याचेही प्रयत्न केले जात होते. पासपोर्ट व्हेरिफिकेशन, छोट्या मोठ्या तक्रारीनिमित्त कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पोलीस ठाण्यामधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्यास गेले असताना रागावून बोलण्याचा किंवा उडवाउडवीचा अनुभव नागरिकांना येतो. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होते. नागरिकांनी चांगली वागणूक मिळावी आणि पोलिसांमध्येही नम्रता यावी, यासाठी हा स्वागत उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले आहे.
रणरणत्या उन्हात सर्व तक्रारदार लांबून येत असतात. उन्हाचा वाढता दाह आणि तापमानात होणारी कमालीची वाढ यामुळे उन्हाच्या काहिलीने त्यांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन कळंबोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी पुढाकार घेत चक्क पोलीस ठाण्याच्या आवारात गूळ-पाण्याची उत्तमरित्या व्यवस्था केली आहे. गूळ-पाणी शरीरात गेल्यानंतर थकवा नाहीसा होतो आणि ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे चिडचिड न होता तक्रारदारही शांतपणे आपली समस्या पोलिसांसमोर मांडतात. पोलीसही तितक्याच शांततेत समजून घेतात. त्यामुळे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी कळंबोली पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतल्यापासून त्या ठिकाणचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. त्यात त्यांनी कल्पकतेबरोबर राबवलेल्या या सुंदर उपक्रमाची सध्या शहरात चर्चा सुरू आहे.