रायगड - जिल्ह्यात 2018 मध्ये जानेवारी ते जून या ६ महिन्यांच्या कालावधीत 118 हिवतापाचे रुग्ण आढळून आले, तर 18 डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. 2019 मध्ये जानेवारी ते जून या ६ महिन्यांच्या कालावधीत 61 हिवतापाचे तर 23 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. ही आकडेवारी लक्षात घेतली तर, जिल्ह्यात हिवतापाचे प्रमाण कमी होत असल्याचे तर डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. हिवतापाचे बहुतांश रुग्ण हे पनवेल आणि उरण परिसरात आढळून आले आहेत. बदलत्या वातावरणामुळे तापाचे रुग्णही वाढले आहेत.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पंधरा ते वीस दिवसात 1611 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील आठवड्यापासून पावसाच्या तुरळक सरी काही तालुक्यात पडत असल्यातरी उष्णतेने रायगडकर घामाने हैराण झाले आहेत. त्यातच ऊन पाऊस सुरू असल्याने वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे साथीच्या रोगांच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पावसाने दडी मारल्याने आता साथीच्या रोगांना आमंत्रण मिळाले आहे. जिल्ह्यात सर्दी आणि तापाची साथ सुरुवात झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज 10 ते 15 तापाचे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. याचबरोबर अनेक भागात पाणी टंचाई जाणवत असल्याने येथील नागरिक पाण्याची साठवण करत असतात. त्यामुळे पाणी साठवलेल्या पाण्याच्या भांड्यामध्ये मलेरिया व डेंग्यूचे डास निर्माण होतात. त्यामुळे मलेरिया व डेंग्यूच्या रोगाची लागण नागरिकांना होते.
जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर औषधेही मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेली आहेत. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत आणि पाणी साठवण ठेवलेली भांडी झाकून ठेवण्याबाबत आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांना सूचना केल्या आहेत. मच्छरांपासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करावा असा सल्ला डॉक्टरानी दिला आहे.
जिल्ह्यात जानेवारी ते जून कालावधीत हिवतापाचे 61 तर डेंग्यूचे 23 रुग्ण आढळले आहेत. संवेदनशील ठिकाणी मलेरिया बाबतची कीटकनाशक फवारणी केली जात असून सध्या उरण तालुक्यात अशी फवारणी सुरू आहे. तर डेंग्यूचे रुग्ण ज्याठिकाणी आढळतात त्याठिकणीही त्वरित तपासणी केली जात आहे. ज्या ठिकाणी डासांच्या अळीची घनता वाढली असेल त्याठिकाणी धूप फवारणी केली जाते.
पावसाने उसंत घेतली असल्याने सर्दी, खोकला याचे रुग्ण वाढत आहेत. तसेच पावसात भिजल्याने न्यूमोनिया होण्याची भीती असते. तर बदलत्या वातावरणामुळे साथरोग होत असतात. यासाठी आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांनीही भिजल्यानंतर स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. ताप, सर्दी, खोकला आला असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करून घ्यावेत.