रायगड - महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी आणि शनिवार-रविवार विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याचे पडसाद नेहमी गजबणाऱ्या मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतुकीवर झालेला दिसून येतोय. दररोज लाखो वाहनांची वाहतूक असणाऱ्या या मार्गावर तुरळकच वाहतूक पाहायला मिळत आहे.
गजबणारा महामार्ग सुनासुना -
कोरोना प्रादुर्भाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होत आहे. परिणामी प्रशासनाने निर्बंध जारी केले असल्याने शनिवार, रविवारी विकेंडच्या दिवशी तर कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या मुंबई - पुणे हायवेवर अत्यावश्यक सेवा वगळता वाहतूक बंद असल्याचे पाहायला मिळाले तर एरवी गजबजलेले रस्ते पुन्हा एकदा निर्मनुष्य झाले आहेत.
विकेंड लॉकडाऊनला उत्फूर्त प्रतिसाद -
नेहमी गजबजलेल्या मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर निवडकच वाहने वगळता पूर्णपणे शुकशुकाट दिसत असून केवळ अत्यावश्यक सेवेमधील गाड्या नियमांचे पालन करत सुरू आहेत.