रायगड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रायगड जिल्ह्यातील मुंबई, ठाणे शहरात राहणारे चाकरमानी त्यामुळे आपल्या मुळ गावी जिल्ह्यात परत येत आहेत. अलिबाग तालुक्यातील कुसुबळे ग्रामपंचायतीने गावात येणाऱ्या आपल्या चाकरमानी बंधू-भगिनींचे स्वागत केले आहे. मात्र, अगोदर पंधरा दिवस क्वारंटाई व्हा आणि नंतर गावात या, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. गावातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने असे नियोजन केले असल्याची माहिती कुसुबळे ग्रामपंचायत सरपंच मीना लोभी आणि उपसरपंच रसिका केणी यांनी दिली आहे.
हेही वाचा... लॉकडाऊनचा आदेश मोडत मशिदीत जमले ४० जण; सरपंचासह सर्वांवर गुन्हा दाखल..
मुंबई, ठाणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईत सध्या भीतीचे वातावरण आहे. रायगड जिल्ह्यातील लाखो चाकरमानी हे मुबई शहरात कामधंद्यानिमित गेले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे आता हे चाकरमानी आपला गाव बरा, असे समजून चालत चालत गावी येत आहेत. त्यामुळे गावागावात सध्या या चाकरमान्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे गावातील ग्रामस्थांना कोरोनाची लागण होऊ शकते, अशी भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा... कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अक्षय कुमारची बीएमसीला 3 कोटीची मदत
अलिबाग तालुक्यातील कुसुबळे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना मुंबई व इतर शहरातून येणाऱ्या नागरिकांची माहिती कळवण्यास सांगितले आहे. गावात येणारे गावकरी हे आमचे बांधव आहेत. त्यामुळे गावात येण्यास आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूवर मात करण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे.
गावात येणाऱ्या चाकरमान्यांनी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घेणे महत्वाचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने बनवलेल्या कॅम्पमध्ये चाकरमान्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची सोय केली असून 15 दिवस कॅम्पमध्ये क्वारंटाईन रहावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना गावात प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती कुसुबळे ग्रामपंचायत सरपंच मीना लोभी आणि उपसरपंच रसिका केणी यांनी दिली आहे. गाव तुमचे, गावातील बांधवही तुमचे, गावात खुशाल या पण गावातील बांधवासाठी पंधरा दिवस क्वारंटाई रहा. हे तुमच्या आणि गावाच्या सुरक्षेसाठी गरजेचे आहे. त्यामुळे गावात येणाऱ्या चाकरमान्यांची माहिती ग्रामपंचायतीकडे त्वरित कळवा, असे उपसरपंच रसिका केणी यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे.