रायगड : केंद्र सरकारने ई-पास रद्द करण्याबाबत सूचना केली आहे. मात्र, राज्यात वाढत असलेल्या कोरोनामुळे ई-पास सुरुच राहणार आहेत. तसेच एसटी बस, रोरो, रेल्वे मधून प्रवास करणाऱ्या प्रवशांनाही ई-पास करण्याचा विचार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही बोलणे झाल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. तसेच सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.
केंद्राने ई-पास रद्द करण्याबाबत राज्यांना सूचना केल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने केंद्राने सूचना केल्यानंतरही ई-पास सुरुच ठेवले आहेत. कोरोनाचा गावागावात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्यांना ई-पास गरजेचा आहे. असे असले तरी एसटी बस, रेल्वे, रोरोमधून येणाऱ्या प्रवाशांना ई-पासची गरज नाही, असा आरोप होत आहे. त्यामुळे याबाबतही राज्य शासनाचा विचार असल्याचे देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यासोबतच, सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला आहे. मुंबई पोलिसांचा जगात दुसरा नंबर लागतो. महाराष्ट्र पोलिसांना बिहारपेक्षा अधिक केंद्र पुरस्कार मिळाले आहेत. सुशांत सिंग प्रकरण आता सीबीआयकडे असून मुंबई पोलीस त्यांना मदत करेल, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी म्हटले आहे.
हेही वाचा - तांबडी हत्याप्रकरण खटला जलद गती न्यायालयात चालविणार - गृहमंत्री अनिल देशमुख