रायगड - नेरळ माथेरान रस्त्यावर दरड कोसळल्याने माथेरानकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरड काढल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. पावसाने सध्या महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. त्यामुळे काहीठिकाणी डोंगराळ भागात दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत.
जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची दमदार सुरुवात झाली असून कर्जत, नेरळ, माथेरान परिसरात पाऊस जोरदार पडत आहे. पावसामुळे नेरळ माथेरान रस्त्याला लागून असलेल्या डोंगरातून सकाळच्या वेळी दरड कोसळून रस्त्याच्या कडेला पडली. यावेळी रस्त्याला लावलेले दुभाजक तोडून दरडीचे तुकडे रस्त्यावर पसरले होते. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
पावसाळ्यात माथेरान रस्त्यावर दरड कोसळण्याची भीती असते. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काळजी घेणे गरजेचे आहे. दरड कोसळण्याची शक्यता असणाऱया भागात बांधकाम विभागाकडून उपाययोजना करण्यात आलेली आहे. मात्र, तरीही मुसळधार पावसात दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात. नेरळ माथेरान रस्त्यावर पडलेली दरड ही मोठ्या प्रमाणात नसली तरी ते रस्त्यावरून काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक पूर्वपदावर आलेली आहे.