रायगड - महाड तालुक्याला पाच दिवसापासून पुराच्या पाण्याने वेढले आहे. त्यामुळे लाखो नागरिक हे पूरपरिस्थितीचा सामना करत आहेत. महाड बाजारपेठेत व परिसरात आठ ते दहा फुटापर्यत पाणी साचलेले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने सामानाचे, धान्याचे नुकसान झाले आहे. पुरामुळे तालुक्यातील वीज, मोबाईल नेटवर्क ठप्प झाले आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, मासळी, दूध यांचा पुरवठा ठप्प झाला आहे. पुरामुळे महाडमधील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.
महाड तालुक्यात पाच दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. महाडमधील सावित्री नदीची धोक्याची पातळी साडेसहा मीटर असून मंगळवारी ही पातळी 9.60 मीटरपर्यत म्हणजे तीन मीटरने वाढली होती. आज धोक्याची पातळी 7 मीटरपर्यत आहे. त्यामुळे महाडला अजूनही पुराचा धोका कायम आहे.
महाडमध्ये पूरस्थिती असल्याने तसेच भोर घाटही बंद असल्याने पुणे येथून येणारी भाजी वाहतूक बंद झाली आहे. शहरातील मासेबाजार असलेल्या सुकट गल्लीत पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे मच्छीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने अनेकजण शाकाहारी जेवण करत असतात. मात्र, महाड शहराला पाच दिवसापासून पाणीच असल्याने भाजीचेही वांदे झाले आहेत. तसेच असलेली भाजी ही भिजली असून खराब झाली आहे व भावही वाढले असल्याने आर्थिक भार नागरिकांना सोसावा लागत आहे.
महाड शहरातील पुरस्थितीने शहराची तसेच तालुक्याची आर्थिक घडी बिघडली आहे. त्यामुळे ही पूरमयस्थिती लवकर निघून जावी अशी याचना महाडकर करत आहेत.
महाडमध्ये दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच
महाडमध्ये रायगड किल्ला रस्त्यावर चित्त दरवाजा येथे दरड कोसळली आहे. भोर घाटात वरंध येथे दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही ठिकाणच्या दरडी काढण्याचे काम सुरू आहे.