रायगड - राज्यातील विविध भागांत विशेषत: सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. येथे जीवितहानीसोबतच वित्तहानीही मोठी झाली आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सध्या अनेक हात पुढे येत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. यावेळी 18 गावांतील 2 हजार 100 कुटूंबांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रांमपचायत विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यात उत्फूर्त सहभाग घेतला.
ग्रामपंचायत विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि जिल्ह्यातील 805 ग्रामसेवकांनी यासाठी मोहिमेत वैयक्तिक सहभाग घेतला. प्रत्येकानी 20 प्रकारच्या जिवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. त्यानंतर त्यांचा संच एकत्रित करून ते अलिबाग येथे पाठविण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंचे बॉक्स सहा ट्रकमध्ये भरून सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागांत पाठविण्यात आले.
ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांच्या समवेत 8 जणांनी प्रत्यक्ष जाऊन पूरग्रस्तांना मदतीचे वाटप केले. शिरगाव, आंद्रे, अंकळखओप, चोपडेवाडी, कवठेसार, कनेगाव, भुवनेश्वर वाडी, धनगाव, रेठारे हरणाक्ष, जुनेखेड, बुर्ली, आंबेवाडी, चिखळीवळवडे येथील कुटूंबांना ही मदत करण्यात आली.