खालापूर (रायगड) खालापूर तालुक्यातील तीन अंगणवाड्यांमध्ये चार अति तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत. यामध्ये वडगाव अंगणवाडीमध्ये दोन तर हातणोली आणि नारंगी अंगणवाडीमधील प्रत्येकी एका बालकाचा समावेश आहे. दरम्यान खालापूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांनी संबंधित अंगणवाड्यांना भेट देऊन पाहाणी केली.
तालुक्यात 30 कुपोषित बालके
खालापूर बिट एकमध्ये पाच, खालापूर बिट दोनमध्ये दोन, वावोशी बिटमध्ये एक, चौक बिट एकमध्ये सहा, चौकबिट दोनमध्ये बारा, लोहोप बिटमध्ये एक अशी एकूण ३० बालके कुपोषित असून यातील चार बालके ही अति तव्र कुपोषित आहेत. या घटनेची दखल घेऊन खालापूर पंचायत समितीच्या सभापती वृषाली पाटील आणि उपसभापती विश्वनाथ पाटील यांनी संबंधित अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
महिलेने दिला आतापर्यंत 7 मुलांना जन्म
दरम्यान हातणोली येथील कुपोषित बालकाच्या मातेने आतापर्यंत तब्बल 7 मुलांना जन्म दिला आहे. त्यापैकी 5 मुले जिवंत आहेत, तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या मातेचे वय देखील कमी असल्याचे समोर येत आहे. दरम्यान बालविवाह व मुलींची माता बनण्याची सक्षमता या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीरपणे विचार व्हायला हवा, असे मत यावेळी विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केले आहे.