रायगड - महाराष्ट्रात मराठी भाषा दिन साजरा होत आहे. मराठी भाषा, संस्कृती, साहित्य टिकले पाहिजे याबाबत शासन प्रयत्नशील आहे. एकीकडे मराठी भाषा टिकवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. दुसरीकडे अलिबाग तालुक्यातील आक्षी गावातील इ स १०१२ मधील मराठीतील पहिला गद्यगळ शिलालेख मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मराठीतील हा पहिला शिलालेख जतन करणे महत्वाचे असून याकडे जिल्हा प्रशासन, पुरातत्व विभागासह शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी आक्षी ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थानी केली आहे.
अलिबाग तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायत हद्दीत शंकर मंदिर आणि ग्रामपंचायत कार्यालय परिसरात दोन शिलालेख आहेत. शालिवाहन शक 934 म्हणजेच इ स. 1012 साली तयार करण्यात आलेले हे शिलालेख आहेत. या शिलालेखाला आज 1008 वर्ष पूर्ण झाले आहेत. मराठीतील हा पहिलाच शिलालेख असून यावर संस्कृतमध्ये कोरून लिखाण केले आहे.
शिलालेख हा ऊन, पावसात आजही उभा असला तरी त्यावर लिहिलेली अक्षरे आता पूर्णतः पुसून गेली आहेत. याबाबत ग्रामपंचायतीमार्फत रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून हा शिलालेख दुसरीकडे हलवून त्याचे जतन करण्याची परवानगी मागितली आहे. हा शिलालेख पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष घालावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
आक्षी गावातील हा शिलालेख पाहण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी पर्यटक, विद्यार्थी येत असतात. अलिबागमधील जे एस एम कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी शिलालेखाचे जतन व्हावे यासाठी पुढाकार घेतला आहे. एकीकडे मराठी भाषा टिकावी यासाठी प्रयत्न सुरू असताना शासनानेही ऐतिहासिक असा मराठीतील पहिला शिलालेख जतन करण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलणे गरजेचे आहे.