रायगड - अलिबाग शहरातील जुना कोळीवाडा परिसरात असणार्या भंगार गोदामाला सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आरसीएफ कंपनी तसेच अलिबाग नगरपरिषदेच्या अग्निशामक यंत्रणेकडून दोन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांची आर्थिकहानी झाल्याची माहिती मिळाली आहे.
शहरातील जुना कोळीवाडा परिसरात इकबाल मेमन यांचे भंगार साहित्याचे गोदाम आहे. या गोदामामध्ये विविध प्रकारच्या भंगाराच्या वस्तू असून त्यात काही प्रमाणांवर रसायन असलेली साधने व गॅस सिलेंडर होते. सायंकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास अचानक यापैकी काही रसायनांनी पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. अचानक लागलेल्या आगीने सर्वजण घाबरुन गेले. यावेळी गोदामामधील व घरातील व्यक्तींना तातडीने बाहेर काढण्यात आले व परिसरातील नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यास सुरूवात केली. अग्निशामक दलाला कळवल्यानंतर अलिबाग नगरपरिषद आणि आरसीएफ कंपनीचे अग्निशामक दल ताबडतोब घटनास्थळी हजर होऊन त्यांनी आग विझविण्यास सुरुवात झाली. पोलिसही घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांना सुरक्षा स्थळी जाण्यास सांगत होते.
गोदामामध्ये असलेल्या रसायनांमुळे पुन्हा पुन्हा आग लागत असल्याने आग विझवण्यास अडचणी येत होत्या. दरम्यान सतर्कता म्हणून अलिबाग शहरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. शेवटी अग्निरोधक बॉल्सचा वापर करुन या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. रात्री साडे आठच्या सुमारास आग विझविण्यात यश आले. या आगीच्या घटनेमुळे नागरीवस्तीमध्ये असणार्या भंगार व्यवसायिकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भंगार व्यवसायिक आपल्या राहत्या ठिकाणालाच अनधिकृतरित्या गोदामाचे स्वरुप देतात. या गोदामामध्ये वेगवेगळया प्रकारचे रसायन असलेली साधने व केमीकलयुक्त छोटे मोठे सिलिंडर्स देखील असतात. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरीवस्तींमध्ये असणाऱ्या भंगार गोदामावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.