रायगड - प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येचे गूढ उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी आत्महत्या का केली असावी याबाबत पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले आहेत. त्यावरुन आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडेल्विस ग्रुपच्या अधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देसाईंच्या पत्नीची तक्रार - यासंदर्भात नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या कलमांखाली हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच पुढील तपास सुरू असल्याचेही रायगड पोलिसांनी सांगितले आहे.
नेहा देसाईंचे गंभीर आरोप - नितीन देसाई यांच्यामागे कर्जाबाबत नेहमीच या कंपन्या आणि त्यातील अधिकारी तगादा लावत असल्याचे नेहा देसाई यांचे म्हणणे आहे. ते त्यांनी त्यांच्या तक्रारीत सांगितले आहे. याच कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या दबावामुळे आपल्या पतीने आत्महत्या केली, असा आरोप नेहा देसाई यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. त्यावरुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास सुरू - खालापुर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान ३०६, ३४ अन्वये वरील ECL फायनांस कंपनी एलवाइज ग्रुपचे पदाधिकारी व इतर असे एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे करत आहेत. पीसीएल फायनान्स कंपनीचे अधिकारी यांची ईडीने 2020मध्ये समन्स पाठवून फोरेक्स स्कॅम प्रकरणी चौकशी केली होती.
नितीन देसाईंची आत्महत्या - प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत कर्जतमधील त्यांच्या एन डी स्टुडिओमध्ये आढळला होता. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या मृतदेहाच्या आसपास कोणत्याही प्रकारची 'सुसाइड नोट' मिळालेली नाही. त्यांच्या अशा पद्धतीने झालेल्या मृत्यूमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांचे नाव चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य कलादिग्दर्शकांमध्ये घेतले जाते. आपल्या कारकिर्दीत परिंदा, हम दिल दे चुके सनम, 1942 - अ लव्हस्टोरी, राजूचाचा, रंगीला, दौड, इश्क, देवदास, हरिश्चंद्राची फॅक्टरीसारख्या अनेक भव्य चित्रपटांचे कलादिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांनी केले होते.
कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या? - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन चंद्रकांत देसाई यांनी एका वित्तीय संस्थेकडून सुमारे 180 कोटी रुपये कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी तारण म्हणून अनुक्रमे 26, 5.89 आणि 10.75 एकर अशा तीन मालमत्ता ठेवल्या होत्या. कर्जाची रक्कम अडीचशे कोटी रुपयांच्या घरात गेल्याची सूत्रांची माहिती आहे. सदर वित्तीय कंपनीने कर्जखाते दुसऱ्या कंपनीकडे सोपवले. कर्जवसुलीसाठी देसाई यांच्याकडे वित्तीय कंपनीने अक्षरशः तगादा लावला होता. कर्ज वसूल न झाल्यास देसाई यांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मिळावी, असा विनंती अर्ज रायगड जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला होता.
हेही वाचा -