रायगड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये पुन्हा एकदा दोन गटात वाद उफाळून आला आहे. या हाणामारीमध्ये दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. खुर्चीसाठी चाललेला हा वाद गेली 12 वर्षांपासून सुरूच आहे. त्यामुळे एकमेकांवर वरचढ होण्यासाठी शिक्षकी पेशा असूनही हाणामारी करून म्हविद्यालायची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे.
बारा वर्षांपासून वाद
डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी महाड येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी हे महाविद्यालय सुरू केले. त्यामुळे हे महाविद्यालय नावाजलेले आहे. मात्र गेल्या 12 वर्षांपासून सोसायटीच्या चेअरमन आणि महाविद्यालयातील प्राचार्यपदाचा वाद सुरू आहे. बारा वर्षात पाच ते सहा प्राचार्य बदलले आहेत. मात्र प्राचार्यपदाची खुर्ची आपल्याकडेच राहावी, यासाठी दोन गटात नेहमीच हाणामारी होत आहे. प्राचार्य सुरेश कडलक आणि धनाजी गुरव यांच्यात आहे
खुर्चीची रेस
महाडमधील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्य पदावरून रस्सीखेच सुरू आहे. पूर्वीचे प्राचार्य धनाजी गुरव याना पदावरून काढल्यानंतर त्याठिकाणी सुरेश कडलक हे प्राचार्य म्हणून रुजू झाले. 10 डिसेंबर रोजी धनाजी गुरव हे रात्रीच्या सुमारास आपल्या साथीदारांसह येऊन त्यांनी सुरेश कडलक आणि त्याच्या माणसांना बाहेर काढले. आज 11 डिसेंबर रोजी प्राचार्य सुरेश कडलक आणि त्यांचे साथीदार महाविद्यालयात येऊन गुरव आणि कडलक गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आनंदराज आंबेडकर यांनाही काही वर्षापूर्वी झाली होती मारहाण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सदस्य आहेत. महाड महाविद्यालयात चेअरमन आणि प्राचार्य हा वाद नेहमीच चर्चेत राहिला आहे. काही वर्षांपूर्वी हा वाद मिटविण्याच्या दृष्टीने आनंदराज आंबेडकर हे महाड महाविद्यालयात आले होते. त्यावेळीही दोन गटात हाणामारी झाली होती. यावेळी आनंदराज आंबेडकर यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता.
महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्राचार्य पदावरून दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणात महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महाड पोलीस करीत आहेत.