रायगड - जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खरीवली, गोठीवली, नंदन पाडा, येथे प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रकल्पाविरोधात स्थानिक प्रकल्पग्रस्त संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. 5 जाने.) तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. दहा गाव शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाचे शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी खंबीरपणे नेतृत्व केले. शेतकऱ्यांना फसवून जमिनीची खरेदी विक्री करणारे दलाल व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. बुधवारी प्रकल्पाबाबत होणारी जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात शेतकरी, वारकरी, महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
खालापूर तालुक्यातील दहा गावात उभी राहत आहे एमआयडीसी
खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता खरीवली, गोठीवली, नंदन पाडा, नारंगी, चिलठंन, स्वाली, तोंडली आदी दहा गावात एमआयडीसीचा प्रस्तावित प्रकल्प उभारला जाणार आहे. यासंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांना विचारात न घेता हा प्रकल्प शासन लादत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रकल्पाला आमचा विरोध नाही मात्र मूळ शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळावा, स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्या, अशी भूमिका येथील शेतकऱ्याच्या आहेत.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांच्या चौकशीची मागणी
दहा गावात येत असलेल्या एमआयडीसी प्रकल्पात स्थानिक शेतकऱ्याच्या जमिनी दलाल आणि कर्मचारी हे फसवणूक करून घेऊ लागले आहेत. त्यामुळे मूळ शेतकऱ्याला पाहिजे तो मोबदला मिळत नाही. त्यामुळे योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना मिळवून शेतकऱ्यांना फसवून जमीन घेणाऱ्यांची चौकशी करावी तसेच बुधवारी होणारी जनसुनावणी रद्द करावी, अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्याच्या आहेत.
वारकरी भजन, कीर्तन करीत मोर्च्यात सहभागी
खालापूर तालुक्यातील दहा गावात येत असलेल्या एमआयडीसी विरोधात शेतकरी आज एकवटले होते. यामध्ये वारकरी संप्रदायही हिरीरीने आंदोलनात सहभागी झाला होता. भजन करत वारकरी मंडळी आंदोलन मोर्चात चालत होती.
आमदार जयंत पाटील यांनी केले मार्गदर्शन
शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वारकरी हे भजन कीर्तन करत सहभागी झाले होते. तर शेतकरी घोषणा देत होते. खालापूर नगरपंचायत समोर मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी मोर्चा अडवला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शिष्टमंडळाने खालापूर तहीसलदार यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
हेही वाचा - 'नाणार प्रकल्प कोकणातून गेल्यास मोठे नुकसान'
हेही वाचा - कणकवलीच्या बाजारपेठतील झेंडाचौकात भीषण आग, तीन दुकाने जळाली