रायगड - माचेल-चिर्बी समुद्र संरक्षक बंधारा उधाणामुळे फुटल्याने 11 गावातील 2700 एकरात खारे पाणी शिरून भातशेती नापीक होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारपर्यंत खारबंदिस्ती संरक्षक बंधाऱ्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, हे आश्वासन पाळले गेले नाही, तर 500 महिला संरक्षक बंधार्यातील खारेपाणी थांबविण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे समुद्राच्या प्रवाहात महिला वाहून गेल्यास त्याला शासन जबाबदार असेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
पेण तालुक्यातील माचेल-चिर्बी समुद्र संरक्षक बंधारा तीन वर्षापासून फुटून भातशेती नापीक होत आहे. या भागात पाच खांड असून यातील चार खाडीचे काम केले आहे. यासाठी शासनाने 45 लाख रुपयाचा निधी दिला आहे. तर राहिलेली खांड ही 70 मीटरची आहे. या खांड बंधार्याची दुरुस्ती करण्याची वारंवार मागणी करूनदेखील शासन अपयशी ठरले आहे. यामुळे 800 हून अधिक शेतकरी कुटुंबं उद्ध्वस्त झाली असून 2700 एकर भातशेत जमीन नापीक झाली आहे. या परिसरात जेएसडब्लू प्रकल्प आल्यानंतर भरावामुळे शेतकऱ्यांच्या शेतात समुद्राचे पाणी घुसत आहे. मात्र प्रशासनाचे याकडे वेळोवेळी दुर्लक्ष होत आहे.
आनंदनगर, देवळी, जुईहब्बास, खारपाले, पाले, म्हैसवाड, ढोबी, जांभेला, माचेला, चिर्बी, खारघाट या अकरा गावांतील महिला शेतकर्यांनी भातशेतीमध्ये घुसणारे खारे पाणी रोखण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणात आतापर्यंत शेतीसाठी कोणी आत्मदहन केलेले नाही. मात्र, अकरा गावावर शासनाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रसंग ओढावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत विविध शेतकरी संघटनांनी अनेक निवेदने शासनास दिली. शिष्टमंडळांनी मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, पेण प्रांत कार्यालयात बैठका झाल्या, रास्ता रोको आंदोलन व उपोषण आंदोलने केली. त्यावेळी पेण प्रांत कार्यालयाने व खारभूमी खात्याने अनेक आश्वासने दिली, मात्र बंधार्याची दुरुस्ती झाली नाही.
याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सुर्यवंशी यांना निवेदन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी खार बंदिस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. सोमवारी काम सुरू न झाल्यास सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे आ. धैर्यशील पाटील यांनी यावेळी सांगितले.
25 दिवसांनी पावसाळा सुरू होत असून आता जर खार बंदिस्तीचे काम झाले नाही, तर अजून 1500 एकर जमीनीत खारे पाणी शिरेल. त्यामुळे या भागातील 5 हजार एकर शेती नापीक होण्याची भीती आहे, असे कष्टकरी महिला आघाडीच्या प्रमुख मंजुळा पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर व खार डोंगर मेहनत आघाडीचे प्रमुख पांडुरंग तुरे, विश्वनाथ शिंदे, हिराबाई पाटील, संगिता पाटील, लक्ष्मिबाई तुरे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.