रायगड - जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पाणवठ्यामध्ये मोठी लालसरी आणि नयनसरी या बदकांच्या दोन नवीन प्रजाती दिसून आल्या आहेत. युरोप आणि सायबेरिया येथून स्थलांतरित झालेले हे बदक पक्षी निरीक्षकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहेत. तसेच या नवीन प्रजातींच्या बदकांना पाहण्यासाठी स्थानिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
उरणच्या पाणवठ्यांकडे विविध पक्षांचा वावर-
उरणच्या परिसरात असलेल्या पाणवठ्यांमध्ये पक्षांच्या अनेक प्रजाती आढळून येतात. यामध्ये आढळणारा 'फ्लेमिंगो' हा पक्षी निरीक्षकांचा विशेष आकर्षण आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उरणच्या या पाणथळ भागात युरोप आणि सायबेरिया येथून आलेले मोठी लालसरी आणि नयनसरी बदक पहिल्यांदाच आढळून आले आहेत.
बहर संस्थेमार्फेत ई-बर्ड संकेतस्थळावर बदकांची नोंद-
उरण येथील 'बहर' संस्थेचे सदस्य वैभव पाटील, हरीष पाटील, निकेतन ठाकूर, अनुज पाटील, अंगराज म्हात्रे, सुरेंद्र पाटील हे बेलपाडा गावाजवळच्या पाणवठ्याजवळ पक्षी निरक्षण करीत होते. यावेळेस, त्यांना लालसरी आणि नयनसरी बदकांच्या नवीन प्रजाती दिसून आल्या. या सदस्यांनी जागतिक नोंदी ठेवणाऱ्या 'ई-बर्ड' या संकेतस्थळावर या बदकांची नोंद केली आहे.

उरणच्या पक्षी वैभवात भर-
या बदकांमधील मोठी लालसरी हा मध्यम आकाराचा पक्षी असून त्याची लांबी ही ५० ते ६० सेंटीमीटर असते. तर, नयनसरी ह्या बदकांची लांबी ही ३५ ते ४० सेंटीमीटर असते. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच या दोन्ही प्रजाती आढळून आल्याने उरणच्या पक्षी वैभवात भर पडली आहे.