रायगड - "गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या" अशा भावपूर्ण घोषणांनी घरोघरी आलेल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन आज (गुरूवारी) होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनासह पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. गणपती विसर्जन हे समुद्र, नदी, तलाव याठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून व पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली आहे.
हेही वाचा - गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा नदीत बुडून मृत्यू
2 सप्टेंबर रोजी घरोघरी बाप्पाचे वाजतगाजत आगमन झाले होते. अकरा दिवस गणरायाची यथासांग सेवा केल्यानंतर अनंत चतुर्थी दिवशी आज (गुरूवारी) लाडका बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात येत आहे. यासाठी जिल्हा पोलीसही सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातील गणेश विसर्जनकरता ७६ अधिकारी, ६५३ पोलीस कर्मचारी, ४ आरसीपी प्लाटून, २ एसआरपी प्लाटून, ५ स्ट्रायकिंग फोर्स, ३५० होमगार्ड असा बंदोबस्त पोलिसांकडून लावण्यात आला आहे.
हेही वाचा - लालबागचा राजाच्या दर्शनाला पोहोचलेल्या स्वरा भास्करवर गुदरला 'हा' प्रसंग
स्थानिक प्रशासनाकडून समुद्र, नदी, तलाव याठिकाणी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. विसर्जनाठिकाणी विजेची सोय, निर्माल्य कलश, सीसीटीव्ही, जीवरक्षक ठेवण्यात आले आहेत. तसेच बाप्पाच्या मिरवणुका निघणार असल्याने विसर्जना ठिकाणी जाणारे रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. तर यावेळीही डीजे सारख्या वाद्यांवर बंदी घालण्यात आली आहे म्हणून पारंपरिक वाद्यात मिरवणुका काढण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.