रायगड - जिल्ह्यातील 26 जुलैपर्यत असलेले अकरा दिवसांचे लॉकडाऊन जिल्हाधिकरी निधी चौधरी यांनी दोन दिवस आधीच शिथिल केले आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काल 23 जुलैला रात्री उशिरा हे आदेश काढले. लॉकडाऊन शिथिल झाल्याने रायगडकरांना तसेच व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याने पूर्वीच्या नियमानुसार सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा जिल्ह्यात लॉकडाऊन करा अशी मागणी रायगडकर करत होते. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्ह्यात 15 जुलै ते 24 जुलै असे दहा दिवसाचे लॉक डाऊन जाहीर केले होते. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी त्यानुसार आदेश काढून 15 ते 26 जुलै असे अकरा दिवसाचे लॉकडाऊन लावले. या लॉकडाऊनमुळे व्यवसायिकांची नाराजी होती. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरू करण्यात दोन वेळा शिथिलता दिली होती.
जिल्हाधिकारी यांनी 23 जुलैच्या रात्री उशिरा दोन दिवस आधीच लॉकडाऊन रद्द केल्याचे आदेश पारित केले आहे. त्यामुळे रायगडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे 25 जुलैपासून जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत सुरू राहणार आहेत.