रायगड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे, हा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आले आहे. कोरोनाबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न, भीती आहे. जिल्ह्याची कोरोना विषाणूबाबत काय परिस्थिती आहे, याची माहिती जनतेला व्हावी यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीप हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रायगडकरांशी संवाद साधणार आहेत.
23 एप्रिलला सकाळी 11 वाजता या माध्यमातून नागरिक आपले प्रश्न, शंका अधिकाऱ्यांसमोर मांडू शकणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या दरम्यान रुग्णसंख्या आटोक्यात ठेवणे, प्रादूर्भाव रोखणे, नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केल्या आहेत.
कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आजारास प्रतिबंध व नियंत्रण यासाठी तातडीच्या व आपत्कालीन उपाययोजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. याची रायगडवासियांना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप हळदे हे रायगडमधील जनतेशी आणि प्रसारमाध्यमांशी @Collectorraigad या फेसबुक पेजवरुन संवाद साधणार आहेत.
जनतेनेही या फेसबुक लाईव्हमध्ये सहभागी होण्यासाठी https://www.facebook.com/collectorraigad या लिंकवर क्लिक करावे. जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून थेट संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.