रायगड - कोरोना रूग्णांना देण्यासाठी सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये पुरेशी औषध उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शासन त्यासाठी पैसे देते. असे असताना शासकीय रूग्णालयांमध्ये उपचार घेणार्या कोरोना रूग्णांना बाहेरून औषध सांगितले जात असेल तर ही गंभीर बाब आहे. कोरोना रूग्णांना बाहेरून औषध आणण्यास सांगणार्या शासकीय रूग्णालयांमधील डॉक्टरांना ताबडतोब बडतर्फ करा. शासकीय रूग्णालयातून खासगी रूग्णालयात जाण्यास सांगत असतील तर त्यांची देखील चौकशी करा, असे आदेश रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांंना दिले.
शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी पालकमंत्री आदिती तटकरे आलिबागला आल्या होत्या. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा - 'आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी समारंभ येत्या काही दिवसात'
जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शासकीय रुग्णालयात औषधाचा पुरेसा साठा असतानाही डॉक्टर कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून औषध आणण्यास सांगितात. तसेच शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्यास शासकीय डॉक्टर सांगतात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी पालकमंत्री यांनी ही गंभीर बाब असून शासनाने औषधांचा परिपूर्ण साठा उपलब्ध करून दिला आहे. अशावेळी बाहेरून औषधे का आणायला सांगता असे सांगून त्वरित असे सांगणाऱ्या डॉक्टरांना बडतर्फ करा, असे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांना दिले आहेत. तसेच याकडे आपण स्वतः लक्ष द्या अशा सूचनाही पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केल्या आहेत.