रायगड - तौक्ते चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यात नुकसान झाले. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, महाड तालुक्यात नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. अलिबागेत मच्छीमार जेट्टी, उसर येथील पडलेली पाण्याची टाकी आणि घराची पाहणी केली. मच्छीमार बांधवांनी जेट्टी रुंदीकरण करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना निवेदन दिले आहे. यावेळी मच्छीमारांच्या अडचणी ऐकून त्या राज्य शासनामार्फत सोडविण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले.
अलिबाग मच्छीमार जेट्टीला दिली देवेंद्र फडणवीसांनी भेट -
अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून वादळाच्या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा नुकसान पाहणी दौरा सुरू झाला. अलिबाग कोळीवाड्यात असलेल्या जेट्टीला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली. तौक्ते चक्रीवादळ असल्याने शेकडो बोटी अलिबाग किनाऱ्याला लावण्यात आल्या होत्या. वादळी वाऱ्याने एकमेकांवर आटपून बोटीचे नुकसान झाले आहे. याबाबत फडणवीसांनी जेट्टीला भेट देऊन मच्छीमार बांधवांच्या अडचणी ऐकून घेतल्या.
अलिबाग मच्छीमार सोसायटी संस्थेने जेट्टी वाढविण्यासाठी दिले निवेदन -
अलिबाग कोळीवाड्यात मच्छीमार बोटी लावण्यासाठी आणि मासळी उतरविण्यासाठी जेट्टी बांधली आहे. ही जेट्टी जुनी झाली असून काही प्रमाणात जीर्ण झाली आहे. वाढत्या मच्छीमार बोटीच्या संख्येमुळे ही जेट्टी अपुरी पडत आहे. त्यामुळे जेट्टीची लांबी 200 मीटर तर रुंदी 15 मीटर वाढवावी यासाठी चेअरमन प्रवीण तांडेल यांनी देवेंद्र फडणवीसांना निवेदन दिले आहे. या निवेदनात डिझेल पंप, शीतगृह, अवजारे ठेवण्यासाठी गाळा, सॅटेलाइट टॉवर, दवाखाना, अधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची व सुलभ शौचालायची सुविधा, जेट्टीवर लाइट सुविधा, मार्गदर्शक खांब या मागण्या निवेदनात केल्या आहेत.
उसर वावे येथे केली फडणवीसांनी पाहणी -
अलिबाग कोळीवाडा येथून उसर येथे वादळाने पडलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी देवेंद्र फडणवीसांनी केली. खानाव ग्रामपंचायत सरपंच जितेंद्र गोंधळी यांच्याकडून याबाबत माहिती फडणवीसांनी घेतली. वावे येथे वादळाने उध्वस्त झालेल्या घराची पाहणी करून फडणवीसांचा रोहा, महाड कडे लवाजमा रवाना झाला.