रायगड - माजी मुख्यमंत्री आणि सद्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी आज सकाळी अलिबागमधील नागाव, चौल, आग्राव भागांना भेट दिली. यावेळी त्यांना बागेत पडलेल्या झाडाच्या खाली वाकून तसेच आडवे पडलेल्या झाडावरून उडी टाकत पाहणी करावी लागली. फडणवीस यांची ही कसरत कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने कोकणला तडाखा दिला. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आले आहेत. फडणवीस यांनी आज अलिबाग तालुक्यातील नागाव, आग्राव, चौल या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. ही पाहणी करताना त्यांना चांगलीच कसरत करावी लागली. ते कधी आडवे पडलेल्या झाडाखाली वाकून येत होते. तर कधी आडवा झालेल्या झाडावर थांबून नुकसानीचा अंदाज घेत होते. फडणवीस यांच्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन ठाकूर, जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते हे देखील उपस्थित आहेत.
यावेळी नुकसान झालेल्या बागयतदारांना माडाची रोपे फडणवीस यांच्या हस्ते वाटप करण्यात आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या ताफा मुरुड, श्रीवर्धनकडे रवाना झाला. श्रीवर्धन येथे ते पत्रकार परिषद घेणार आहेत. दरम्यान, फडणवीस यांच्या दौऱ्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांचा दौरा केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटींच्या मदतीचीही घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसाच्या कोकणच्या दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पवारांनी राज्य सरकारकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन कोकणवासीयांना दिले आहे.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीस कोकण पट्ट्यात; 'निसर्ग'मुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी
हेही वाचा - समुद्राचा आणि नागपूरचा काही संबध नाही, पवारांचा फडणवीसांना टोला