रायगड - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात खबरदारीची पावले उचलली आहेत. जिल्ह्यात पर्यटनस्थळ, समुद्रकिनारे यावर पर्यटकांना आणि नागरिकांना जिल्हा प्रशासनाने प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली असली तरी जिल्ह्यातील पर्यटनाला कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसू लागला आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारेही आता निर्मनुष्य दिसू लागली आहेत.
रायगड हा पर्यटन जिल्हा असून समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, गड, धार्मिक स्थळे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नेहमी पर्यटकांचा राबता असतो. शनिवार, रविवार आणि सलग लागून सुट्या आल्या की मुंबई, पुणे, ठाणे येथून पर्यटक मजा करण्यासाठी वाहनाने आणि जलवाहतुकीने येत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, हॉटेल्स, लोजेस, रिसॉर्ट ही पर्यटकांनी गजबजून जातात. पर्यटकांमुळे स्थानिकांचा व्यवसाय तेजीत असतो. मात्र कोरोना विषाणूमुळे सध्या पर्यटन व्यवसायाला घरघर लागली आहे. जिल्ह्यात समुद्र किनारे, पर्यटन स्थळे यावर जिल्हा प्रशासनाने जाण्यास बंदी केली आहे.
अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत हद्दीत असलेला समुद्रकिनारा हा नेहमी पर्यटकांनी गजबजलेला असायचा. मात्र, कोरोना विषाणूच्या अनुषंगाने नागाव ग्रामपंचायतीने लॉजेस, हॉटेल, रिसॉर्ट व्यवसायिक याची बैठक घेऊन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लॉजेस, रिसॉर्ट बंद करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला हॉटेल व्यवसायिकांनी प्रतिसाद दिला असून साडेतीनशे हॉटेल्स, लॉज बंद केली आहेत. त्यामुळे गजबजलेला नागाव परिसर हा सूनासुना झाला आहे. तर येणाऱ्या तुरळक पर्यटकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या ठिकाणच्या सर्वच समुद्रकिनारी हीच परिस्थिती निर्माण झाली असून कोरोना विषाणूचा फटका हा पर्यटन व्यवसायाला बसू लागला आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांच्या आरोग्य दृष्टीने घेतलेला जिल्हा प्रशासनाचा निर्णय हा योग्य असल्याचे मत हॉटेल व्यावसायिक दिनकर कुंभार यांनी सांगितले.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयाच्या कामकाज वेळेत बदल
कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा न्यायालयाने न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेत बदल केला आहे. जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयाचे काम हे 31 मार्चपर्यंत 17 मार्चपासून साडेदहा ते अडीच या वेळेत होणार आहे. न्यायालयाची कामकाजाची वेळ ही अकरा ते दोन राहणार आहे. कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी मोजकीच महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. विधी सेवाच्या माध्यमातून न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनिटायझरची सुविधाही करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समिती सचिव संदीप स्वामी यांनी दिली आहे. न्यायालयीन कर्मचारी हे तोंडाला मास्क लावून काम करीत आहेत.