रायगड - मार्च 2020ला कोरोना सारखा घातक विषाणू आजार सुरू झाला. अद्यापही कोरोनाने पाठ काही सोडलेली नाही. कोरोना विषाणूला टक्कर द्यायची असेल तर स्वतःची आरोग्य प्रतिकार क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना संकटात नागरिकांची जगण्याची जीवनशैली ही पूर्णतः बदललेली आहे. नागरिकांच्या आरोग्य, राहणीमान, खाण्याच्या सवयीत बदल झाले आहेत. कोरोनाच्या महामारीत आपण काय खाणे योग्य आहे, याबाबत नागरिक सतर्क झाले आहेत. कोरोना काळात आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, याबाबत आहारतज्ज्ञ शंकर फुलवले यांनी इटीव्ही भारताला दिलेली प्रतिक्रिया.
कोरोनाने लोकांच्या जीवनशैलीत झाला बदल
एखादा व्यक्ती ताप, मधुमेह, बीपी, कॅन्सर वा इतर आजाराने ग्रस्त झाली तर त्यावर उपचार घेत असते. अशा आजारात आजारी व्यक्तीच्या आणि कुटूंबाच्या जीवनशैलीत काही दिवसांसाठी थोडा बदल घडत असतो आणि त्यानंतर पुन्हा आपल्या नेहमीची जीवनशैलीमध्ये ते जगत असतात. मात्र, कोरोना संकट आले आणि लोकांच्या जीवनशैलीत कमालीचा बदल होताना दिसू लागला आहे. कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी आपली प्रतिकार शक्ती वाढवू लागले आहेत. मास्कचा वापर वाढला, दुसऱ्याला भेटताना अंतर पडू लागले. खाण्याच्या बाबतीत सजगता आली आहे. त्यामुळे कोरोनाने लोकांची आरोग्य, खानपान, राहणीमान यात बदल होऊ लागला आहे.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रोटीन आहार घेणे महत्वाचे
कोरोनाच्या या संकटात आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणे सर्वात महत्वाचे आहे. यासाठी प्रोटिनयुक्त आहार घेणे महत्वाचे आहे. कोरोना हा संसर्गजन्य असल्याने तो होणारच नाही असे नाही. मात्र, झाल्यानंतर त्यावर मात करण्यासाठी आपली प्रतिकार शक्ती मजुबत करावी लागणार आहे. यासाठी अंडी, दूध, हिरव्या पालेभाज्या, फळे यामधून जीवनसत्व मिळत असल्याने आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. पचनशक्तीही वाढली जात असून त्यामुळे शरीराला आराम मिळतो. ड्रायफ्रूटचा आहार घेणे हे सुद्धा प्रतिकार शक्ती वाढण्यास उपयुक्त आहे. व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे हे शरीरासाठी महत्वाचे आहे. असा सल्ला जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आहारतज्ज्ञ शंकर फुलवले यांनी दिला आहे.
कोरोनामुळे बदललेल्या जीवनशैलीत उत्तम आहार हा महत्वाचा भाग आहे
फास्टफूडच्या काळात आरोग्याची काळजी घेणे कुठेतरी दुर्लक्ष होत होते. कोरोनामुळे लोक आहाराकडे लक्ष देऊ लागले आहेत. कोरोनासारख्या विषाणूला दूर ठेवण्यासाठी नियमांचे पालन आणि आरोग्य प्रतिकार शक्ती वाढविणे ही महत्वाची बाब झाली आहे. त्यामुळे या कोरोनामुळे बदललेल्या जीवनशैलीत उत्तम प्रोटिनयुक्त आहार घेऊन निरोगी जीवनशैली जगणे गरजेचे आहे.