रायगड - छत्रपती संभाजी महाराज यांचा 338 वा राज्याभिषेक सोहळा मंगळवारी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्या वतीने पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे किल्ले रायगडावर आयोजन केले होते.
सकाळी संभाजी महाराजांची पालखी वाजतगाजत होळीच्या माळावरुन नगारखान्यापाशी आली. तेथे ध्वजारोहण व ध्वजवंदन झाल्यानंतर पालखीचे राजसदरेवर आगमन झाले. तेथे महाड पंचायत समितीच्या सभापती सपना मालुसरे यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या घोषात संभाजी महाराजांच्या पुतळयावर अभिषेक करण्यात आला. प्रकाशस्वामी जंगम यांनी याचे पौरोहित्य केले. संभाजी महाराजांचे गुणगान गाणारे पोवाडे, व्याख्याने यावेळी सादर करण्यात आली.
राजसदरेवरुन जगदीश्वर मंदिरापर्यंत पालखीची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. तेथे सोहळ्याची सांगता झाली. यावेळी शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा जयघोष सुरू होता. शिवप्रेमी, शंभूप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने हजर होते.
रोपवे बंदमुळे शिवभक्तांचा खोळंबा
किल्ले रायगडावर आज तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराजांचा 338 वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाला. मात्र, गडावर जाणाऱ्या रोपवेमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी 7.45 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत तब्बल 5 तास रोपे सेवा बंद पडल्याने शिवभक्तांचा खोळंबा झाल्याने राज्याभिषेकाचे स्वागताध्यक्ष आमदार भरत गोगावले यांच्यासह शेकडो शिवभक्त पायथ्याशीच अडकले. महाड पंचायत समितीच्या सभापती सपना मालुसरे यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. रोपवे प्रशासनाच्या गैरसोयी विरोधात शिवभक्तांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.